मारहाणीत तरुणाचा मृत्यू : आरोपीला ५ वर्षांची शिक्षा

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) पूर्ववैमनस्य आणि शिवीगाळीच्या कारणावरून झालेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने मुख्य आरोपीला दोषी ठरवले आहे. न्यायाधीश एस. एस. गोरवाडे यांनी सोमवारी (दि. १५) आरोपीला पाच वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.
या प्रकरणातील आरोपी सुनील प्रभुदास पारधे याला भारतीय दंड संहितेच्या कलम ३०४ अंतर्गत दोषी ठरवत पाच वर्षांची सक्तमजुरी आणि १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. तर मनोज पारधे आणि सागर पारधे यांना ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर आणि तीन वर्षे चांगल्या वर्तणुकीच्या अटीवर मुक्त करण्यात आले. तसेच सुनील पारधे व प्रभुदास अमरनाथ पारधे यांना प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड सुनावण्यात आला. या प्रकरणी नाझीम मुस्तफा शहा (रा. मिसारवाडी) यांनी सिडको पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार २१ मार्च २०२२ रोजी रात्री सुमारे ९ वाजता सलीम मुस्तफा शहा (३०) हा घराबाहेर बसलेला असताना आरोपींनी त्याला घराजवळून ओढत संघर्ष चौकात आणले. तेथे त्याला शिवीगाळ करून चापटा व लाथाबुक्क्‌यांनी मारहाण करण्यात आली. उपचारासाठी त्यास खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेपूर्वी काही दिवस सुनील पारधे याने सलीमच्या घरासमोर येऊन शिवीगाळ केली होती. त्यावेळी सलीमने त्याला समजावून सागितले असता त्याने जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले होते.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions